नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. त्यांनी ट्विटरव्दारे हि घोषणा केली होती.
भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारला फटकारलं आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार करण्यात आलं. मोदी सरकराची ही लोकभावना नसून राजकीय खेळ आहे. राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करता देखील मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.