भोपाळ | प्रतिनिधी
मध्यंतरापर्यंत १-० ने पिछाडीवर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यात जोरदार मुसंडी मारत चीनला ३-१ असे पराभूत केले आहे. या विजयासह भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या जेतेपदावर मोहोर उमटवली. दीपिकाच्या दोन आणि इशिकाच्या एका गोलच्या जोरावर भारताने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत ऐतिहासिक हॅटट्रिक साजरी केली.
भोपाळ येथील नाथू बरखेडा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात हा अंतिम सामना पार पडला. सामन्याच्या सुरुवातीला चीनने भारतीय संघासमोर कडवे आव्हान उभे केले होते. २५ व्या मिनिटाला चेन युजुन हिने गोल नोंदवून चीनला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे मध्यांतरापर्यंत भारतीय संघ १-० ने मागे होता. मात्र, विश्रांतीनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सामन्याचे पारडे फिरवले.
तिसऱ्या सत्रात भारताने लागोपाठ तीन गोल केले. ३८ व्या मिनिटाला दीपिकाने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ४२ व्या मिनिटाला इशिकाने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. लगेचच ४३ व्या मिनिटाला दीपिकाने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताला ३-१ अशा भक्कम स्थितीत नेले. तिसऱ्या सत्रातील या तीन गोलांनीच सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने वळवला.
या स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता सातही सामन्यांमध्ये विजय मिळवून अपराजित विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत भारताने मलेशियाला ६-२ असे पराभूत केले होते. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक १२ गोल झळकावून दीपिकाने भारतीय आक्रमणाचे यशस्वी नेतृत्व केले.
याआधी भारतीय महिला संघाने २०१६, २०२३ आणि २०२४ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. आता २०२६ च्या विजयामुळे सलग तीन जेतेपदांची नोंद करत भारत या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक चार वेळा चॅम्पियन ठरणारा संघ बनला आहे. या कामगिरीतून भारतीय महिलांनी आशियाई हॉकीवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.






