मुंबई | प्रतिनिधी
एमबीए फाउंडेशनच्या (MBA Foundation) २५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात टी-२० व्हीलचेअर क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोमांचक लढतीत मुंबईच्या संघाने महाराष्ट्रावर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. महाराष्ट्राने विजयासाठी दिलेले ५६ धावांचे लक्ष्य मुंबईने अवघ्या ६.२ षटकांत सहज पूर्ण केले.
दिव्यांगांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे, व्हीलचेअर क्रिकेटला अधिक चालना देणे आणि सर्वसमावेशक खेळांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे, या मुख्य उद्देशाने या सामन्याचे आयोजन करण्यात आले. हा सामना माटुंगा पूर्व भागातील खालसा कॉलेज क्रिकेट मैदानावर २७ नोव्हेंबर २०२६ रोजी खेळवण्यात आला.
या सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत महाराष्ट्राच्या संपूर्ण संघाला १२.३ षटकांत अवघ्या ५५ धावांवर गुंडाळले. महाराष्ट्राच्या डावात संघपाल बाविस्कर यांनी सर्वाधिक २४ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून गोलंदाजी करताना सदाशिव शिंदे याने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत हॅट्रिकसह ३ बळी मिळवले आणि सामन्यावरील संघाची पकड मजबूत केली.
विजयासाठी आवश्यक असलेल्या ५६ धावांचे आव्हान मुंबई संघाने अवघ्या ६.२ षटकांत ४ गडी गमावून ५८ धावा करत लीलया पेलले. या विजयासह मुंबईने १३.४ षटके शिल्लक ठेवून ६ गड्यांनी सामन्यावर मोहोर उमटवली. मुंबईच्या विजयात गणेश शेलारने नाबाद २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार राहुल रामुगडे ९ धावांवर नाबाद राहत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
या टी-२० लढतीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुंबईच्या सदाशिव शिंदेला ‘सामनावीर’ (Player of the Match) म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्वोत्तम फलंदाजाचा (Best Batsman) मान मुंबईच्या गणेश शेलारने पटकावला, तर सर्वोत्तम गोलंदाज (Best Bowler) म्हणून मुंबईच्याच मनोज शर्माची निवड झाली. तसेच, महाराष्ट्राच्या शेखर म्हस्के याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक (Best Fielder) म्हणून गौरवण्यात आले.






