स्पोर्ट्स पॅनोरमा | वृत्तसेवा | मुंबई
मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रातील एक दमदार नाव आणि ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून प्रसिद्ध असलेला शरीरसौष्ठवपटू सागर माळी याचे अवघ्या ३८व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून तो गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होता. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यानंतर त्याच्यावर डायलेसिस सुरू होते. अखेर त्याची ही झुंज संपली. सागरच्या अकाली निधनामुळे मुंबईसह राज्यातील शरीरसौष्ठव क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
२०१३ मध्ये पटकावला ‘मुंबई श्री’ किताब
सागर माळीने २०१३ मध्ये प्रतिष्ठेचा ‘मुंबई श्री’ किताब पटकावत शरीरसौष्ठव क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याची धिप्पाड शरीरयष्टी, दणकट स्नायू आणि स्टेजवरील आक्रमक आत्मविश्वास यामुळे तो शरीरसौष्ठवप्रेमींच्या विशेष पसंतीस उतरला.
जागतिक कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू रॉनी कोलमन याची झलक सागरच्या शरीरयष्टीत दिसत असल्यामुळे त्याला ‘रॉनी’ किंवा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ असे टोपणनाव मिळाले. कालांतराने हेच नाव त्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनले.
मि. वर्ल्डमध्ये चौथा क्रमांक
‘मुंबई श्री’च्या यशानंतर सागरने महाराष्ट्र श्री आणि भारत श्री यांसारख्या प्रतिष्ठेच्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्येही आपली छाप पाडली.
२०१४ मध्ये मुंबईत झालेल्या मि. वर्ल्ड स्पर्धेत ८५ किलो वजनी गटात त्याने चौथा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली ताकद दाखवून दिली.
२०१६ मध्ये त्याचा महाराष्ट्र श्री किताब अगदी थोडक्यात हुकला. त्यानंतरही त्याने आपली जिद्द कायम ठेवली. २०२० मधील महाराष्ट्र श्री स्पर्धेत सुनीत जाधवला त्याने कडवी झुंज दिली, मात्र विजेतेपदापासून तो दूर राहिला.
वर्तमानपत्रे वाटणारा तरुण बनला वर्तमानपत्रातील ‘स्टार’
सागर माळीच्या आयुष्यातील सर्वांत प्रेरणादायी बाब म्हणजे त्याचा शरीरसौष्ठव क्षेत्रापर्यंतचा प्रवास.
त्याची सुरुवात एखाद्या मोठ्या व्यायामशाळेतून किंवा व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातून झाली नव्हती. घरोघरी वर्तमानपत्रे टाकताना त्याच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंच्या बातम्या आणि फोटो पाहून त्याच्या मनात या खेळाची आवड निर्माण झाली.
वयाच्या विशीत त्याने शरीरसौष्ठव क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत, व्यायाम आणि शिस्तीच्या जोरावर काही वर्षांतच परिस्थिती बदलली. ज्या वर्तमानपत्रांमध्ये तो इतर शरीरसौष्ठवपटूंचे फोटो पाहायचा, त्याच वर्तमानपत्रांमध्ये पुढे सागर माळीचे फोटो आणि त्याच्या विजयाच्या बातम्या झळकू लागल्या.
पिळदार शरीरयष्टीने निर्माण केली स्वतंत्र ओळख
२०१९ पर्यंत सागर आपल्या जबरदस्त शरीरयष्टीने शरीरसौष्ठवप्रेमींचे लक्ष वेधून घेत होता. स्नायूंची ठेवण, शरीराची भव्यता आणि स्टेजवरील आत्मविश्वास यामुळे तो मुंबईच्या शरीरसौष्ठव विश्वातील लक्षवेधी चेहरा बनला होता.
मात्र कोरोनानंतर त्याने शरीरसौष्ठवापासून काही काळ विश्रांती घेतली. दुर्दैवाने ही विश्रांती पुढे कायमची ठरली.
दोन्ही मूत्रपिंडे निकामी; सुरू होते डायलेसिस
गेल्या दोन वर्षांपासून सागर माळी गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होता. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आणि त्याच्यावर नियमित डायलेसिस सुरू करण्यात आले.
शरीर घडविण्यासाठी आयुष्याची अनेक वर्षे झोकून देणाऱ्या या शरीरसौष्ठवपटूला अखेर स्वतःच्या शरीरातील एका महत्त्वाच्या अवयवाशी जीवघेणी झुंज द्यावी लागली.अखेर ही झुंज अपयशी ठरली आणि अवघ्या ३८व्या वर्षी सागरने जगाचा निरोप घेतला.
शरीरसौष्ठव विश्वाची मोठी हानी
सागर माळीचे निधन ही केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठव क्षेत्रासाठी मोठी हानी मानली जात आहे. सामान्य परिस्थितीतून पुढे येत कठोर मेहनतीच्या जोरावर मुंबई श्रीपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारणारा त्याचा प्रवास नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रेरणादायी राहील.
‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून शरीरसौष्ठवप्रेमींच्या मनात घर केलेला सागर माळी आता स्टेजवर दिसणार नसला, तरी त्याची पिळदार शरीरयष्टी, संघर्ष आणि स्पर्धांमधील दमदार कामगिरी कायम स्मरणात राहणार आहे.
क्रीडा मार्गदर्शक भरती प्रकरण पुन्हा चर्चेत; सहसंचालक सुधीर मोरे यांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी




